नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
पोलीस डायरी प्रतिनिधी, चंद्रपूर, : ‘चलेजाव’ आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात प्रथम भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. देशात सर्वांत पहिले स्वातंत्र्य अनुभवण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्यातील चिमूरला लाभले. ही शहिदांची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्ज्वल्य आठवणींना उजाळा देऊन शहिदांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतिक समजून काम करा. हे अभियान यशस्वी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, यादृष्टीने जनजागृती करा, अशी सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.
नियोजन भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मंगेश खवले चंदनसिंग चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.
13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यात तिरंगा फडकला. आता अभियानातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा. भारताच्या तिरंगा ध्वजाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घरावर लावलेला तिरंगा सलग तीन दिवस ठेवून 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी सन्मानपूर्वक उतरवावा. यासाठी ध्वज संहितेमध्ये रात्री तिरंगा फडकविण्याबाबत शिथिलता देण्यात आली आहे.’ ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिलेले कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागात विभागून उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले.
नागरिकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून द्यावा. तसेच या अभियानांतर्गत सरकारी इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करावी. देशभक्तीपर गीते आणि संदेश प्रसारीत करावे. तसेच ‘तिरंगा सेल्फी पॉईंट्स’ मोठ्या प्रमाणात लावावे. नागरिकांनीसुध्दा तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी ‘harghartiranga.com’ या संकेतस्थळावर अपलोड करावा. नागरिकांना ध्वज वाटप करताना त्यांच्याकडून संकल्पपत्र सुध्दा लिहून घेण्याचे नियेाजन करावे, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिली.