पो. डा. वार्ताहर #पंढरपूर : आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. या वारकरी भाविकांचे मुख्यमंत्री या नात्याने स्वागत करतो. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला, हे आपले भाग्य आहे, असे मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे म्हणाले.
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवून ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू केली आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच आणि मंदिर आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.