पो. डा. वार्ताहर नागपूर : कोविडमध्ये अनाथ झालेली मुले, पालक गमावलेली मुले, विधवा झालेल्या महिला यांना शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी केली.
महिला व बालविकास विभागामार्फत आज आयोजित जिल्हा कृती दल समिती, मिशन वात्सल्य समिती आढावा तसेच बाल संरक्षण समितीच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी ही सूचना केली. मिशन वात्सल्य अंतर्गत योजनांचा लाभ संबंधितांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह बालकल्याण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.