पो. डा. जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र मशारकर चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागातर्फे तलाठी संवर्गातील एकूण ४६४४ पदांची सरळ सेवा भरती २०२३ करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. परंतु त्यासाठी करण्यात येणारे शुल्क हे भरमसाठ असून त्यात कपात करावं यासाठी मनसेने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन केले आहे.
महाराष्ट्रातील २०१९ मधील जिल्हा परिषदेच्या मेगा भरती करिता ११ लाखांहून अधिक बेरोजगारांचे अर्ज परीक्षेसाठी प्राप्त झाले होते, तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरती साठी देखील ६ लाखांच्या वरून अर्ज करण्यात आले होते.
शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले राज्यभरातील बेरोजगार तरुण तरुणी राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरतीची प्रतीक्षा करीत असतात, महाराष्ट्रातील बेरोजगारांची संख्या व नौकर्या चा दुष्काळ बघता इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत असताना खुल्या प्रवार्गाकडून १००० रुपये तर राखीव प्रवार्गाकडून ९०० रुपये इतके भरमसाठ ना परतावा परीक्षा शुल्क आकारून राज्य शासन परीक्षेची जबाबदारी दिलेल्या कंत्राटदाराला शेकडो कोटी रुपये मिळवून देण्याच्या नादात विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोप करीत, हि भरती सुशिक्षित बेरोजगारांसाठी आहे कि त्यांची लुट करून कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी असा सवाल मनसेने केला आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागाच्या परीक्षा रद्द झाल्या, काही भरती प्रक्रिया ‘पेपरफुटी’मुळे स्थगित करण्यात आल्या. आधीच जागा कमी निघतात, त्यात परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा झाल्यात तर निकाल कधी लागेल, याचा थांगपत्ता नसतो, सर्व टप्प्यात पात्र ठरल्यानंतरही परीक्षार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते, अशी संभ्रमाची स्थिती असतानाही परीक्षार्थी शासकीय नोकरीची आशा बाळगतात. त्यात परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करून ते ना-परतावा असल्याचे जाहीर करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.
सर्वसामान्य परीक्षार्थ्यांना परवडेल असे शुल्क आकारावे, जेणेकरून परीक्षा देणे आर्थिकदृष्ट्या सोपे होईल करीता दुप्पट झालेल्या परीक्षा शुल्क त्वरित रद्द करून येणाऱ्या परीक्षामध्ये देखील वाजवी शुल्क विद्यार्थ्यांकडून आकरण्यात यावे यासाठी आज मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री महसूल विभाग व परीक्षा राज्य समन्वयक यांच्याकडे परीक्षा शुल्क कपात करावं यासाठी मागणी केली व यासाठी मनसे अध्यक्ष यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मनवीसेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, राहुल खारकर, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, कामगार सेना अध्यक्ष अक्षय चौधरी, करण नायर, मयूर मदणकर, नीतेश शेंडे, राकेश बोरीकर, कार्तिक खंगार, सतीश वाकडे, यश घागरगुंडे, अक्षय काकडे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.