पो.डा. वार्ताहर , मुंबई :
जून रोजी जगभरात आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्रातील ४१९ औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, मुख्य कार्यालय, ६, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय, ३६ जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी / कार्यालय, ४३ मूलभूत प्रशिक्षण संस्था तथा अनुषंगिक सूचना केंद्र अश्या राज्यातील सर्व कार्यालये व संस्थांमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.
आरोग्याच्यादृष्टीने योग साधनेचे अनन्यसाधारण महत्व असून, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग साधनेची गोडी वृद्धिंगत व्हायला हवी. या उद्देशानेच कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक ITI मध्ये योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमात प्रशिक्षणासाठी स्थानिक प्रशिक्षकांना पाचारण केले गेले किंवा आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध ऑडिओ व्हिज्युअलची मदत घेण्यात आली. योग साधनेचे महत्व विद्यार्थ्यांना नक्कीच या उपक्रमामुळे पटेल आणि त्यातून एक आरोग्यदायी सवय त्यांना लागेल असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
“आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग साधेनेला अनन्य साधाराण महत्व प्राप्त करून दिले आहे. त्यांच्यामुळे जगभर भारतीय संस्कृतीचा जागर झाला. आज संपूर्ण जग उत्स्फूर्तपणे योग साधना आत्मसात करत असताना आपण देखील आपली संस्कृती विसरता कामा नये. आपल्या तरुण पिढीने हा वारसा पुढे न्यायलाच हवा. या वेगवान जीवनात सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे कौशल्य त्यांनी अंगिकारायला पाहिजे आणि त्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरेल” अश्या शुभेच्छा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यक्रमासाठी दिल्या होत्या.
महाराष्ट्रात नगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आणि मुंबईसह सदर कार्यक्रम ३६ जिल्ह्यात साजरा करण्यात आला. दादर आणि ठाणे येथे महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ITI मधील मुलींचा सहभाग यावेळी उल्लेखनीय ठरला. तसेच आयटीआय रत्नागिरी येथे योग शिक्षक श्री विश्वनाथ वासुदेव बापट वय वर्ष 73 हे हजर होते. येथे योग दिनाचे औचित्य साधून, ओपन जिमचे उद्घाटन केले गेले व सर्व प्रशिक्षणार्थींसाठी व्यायामाचे दालन सुरु करण्यात आले. यासारख्या अनेक उल्लेखनीय घटनांसह आजचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.