पो.डा. वार्ताहर, चंद्रपूर :
शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या व कोंबड्या जळून खाक, तसेच अन्नधान्यचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालय धावून आले. तसेच तात्काळ पुढाकार घेवून कार्यालयाच्या वतीने सदर शेतकऱ्याला 1 लक्ष रुपयांची मदत केली.
कोरपना तालुक्यातील खिर्डी ग्रामपंचायत अंतर्गत निजामगोंदी येथील शेतकरी कर्णू वाघू मडावी यांच्या शेतातील गोठयाला अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत 20 बक-या व दोन वासरांसह 30 कोंबडयांचा तडफडून मृत्यु झाला. ही घटना रविवारी दि. 9 जून 2024 ला रात्री 8.30 वाजता च्या सुमारास घडली. या आगीत दोन क्विंटल गहू, तांदूळ, 25 पीव्हीसी पाईप, दहा बॅग खते व शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
निजामगोंदी येथील शेतकरी कर्णू वाघू मडावी यांनी शेतात गोठा बांधला. गोठयात त्यांनी 20 बक-या , दोन वासरे बांधून ठेवले होते. शिवाय बेंडव्यात 30 कोंबड्या ठेवल्या होत्या. हा गोठा गावापासून अर्धा किमी अंतरावर असून गहू, तांदूळ व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी तिथे ठेवले होते. शेतकरी मडावी हे रोज गोठ्यातच जागली करायचे. मात्र रविवारी काही कामानिमित्त ते बाहेरगावी गेले. त्यामुळे गोठ्यात राखणीसाठी कुणीच नव्हते. दरम्यान रात्री अचानक 8.30 वाजातच्या सुमारास अचानक गोठयाला आग लागली. त्यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले व बक-या, वासरे, कोंबळया जळून मृत्यु पावल्याचे दिसून आले.
सदर घटनेची माहिती मिळताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कार्यालयातील निरीक्षक यांना घटनास्थाळी भेट देण्याचे आदेश दिले. त्या नुसार निरीक्षक यांनी शेतकरी कर्णू वाघू मडावी यांची भेट घेवून त्याठिकाणी घडलेल्या घटनेचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी यांनी कार्यालय अंतर्गत येणा-या कार्यालयीन, वसतिगृह, शासकीय आश्रम शाळा व सर्व कार्यालयीन कर्मचा-यांना सदर शेतक-याला आर्थिक मदत करण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने कर्मचा-यांनी एका दिवसात एकुण 51,500 रुपयाचा मदत निधी गोळा केला.
तसेच अनुसुचित जमातीच्या लोकांना आपात्कालीन / नैसर्गिक/ अमानवीय परिस्थितीमध्ये अर्थसहाय्य देणे/ तदर्थ समितीच्या शिफारशीनुसार 50 हजार पर्यंतची मदत या योजनेअंतर्गत एकुण 50 हजार तात्काळ मंजूर करून घेतले. अशा प्रकारे एकूण रूपये 1 लक्ष 1हजार 500 रुपयांची आर्थिक मदत सदर शेतक-याला 14 जून रोजी प्रत्यक्ष घरी जावून देण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले, गिरीश पोळ, लेखाधिकारी संजय जगताप,आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर उपस्थित होते.
कर्तव्यदक्ष प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची यांनी पिडीत शेतक-याला एकुण 1 लक्ष 1हजार 500 रूपयांची तात्काळ आर्थिक मदत वसतिगृह, शासकीय आश्रम शाळा व सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने प्राप्त करून दिली. सदर शेतक-याला ही मदत त्याला दुखातून सावरण्यात नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही.