मतदान केंद्रांना अडीच हजार मेडीकल कीटचे वितरण
पो.डा. वार्ताहर, पुणे :
मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार असून उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेऊन निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी २ हजार ६९१ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.
मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ २७७, चिंचवड १५९ व पिंपरी १५० याप्रमाणे ५८६ कीट, तसेच पुणे लोकसभा मतदार संघातील वडगावशेरी १४४, शिवाजीनगर ११३, कोथरुड १२८, पर्वती ११८, पुणे कॅन्टोन्मेंट ११५ व कसबा पेठ ११९ याप्रमाणे ७३७ कीटचे वितरण करण्यात आले.
शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर ३०६, आंबेगाव २५८, खेड-आळंदी २६०, शिरुर २३०, भोसरी १५६ व हडपसर १५८ अशा एकूण १ हजार ३६८ मेडीकल कीटचे वितरण करण्यात आले. तिन्ही लोकसभा मतदार संघातील ५ हजार ८६६ मतदान केंद्रासाठी ५८ हजार ६६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले.
कीटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन प्रत्येक पिशवीवर मतदार संघाचे नाव लिहून ठेवण्यात आले होते. या सर्व कीट मतदान साहित्य वितरण केंद्रावर स्वतंत्र वाहनाद्वारे पाठविण्यात आल्या. १२ मे रोजी सकाळी मतदान साहित्यासोबत या कीटचे वाटप मतदान पथकांना करण्यात येणार आहे.
प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस,बीटाडाईन ट्यूब, अँटीसेफ्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. साहित्य व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयक अधिकारी रेश्मा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक समन्वयक अधिकारी सूर्यकांत पठाडे यांच्या उपस्थितीत मेडिकल कीटचे वितरण करण्यात आले.
*मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची उभारणी*
जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणाऱ्या सर्व मतदान केंद्रांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आश्वासित किमान सुविधा, अन्य सुविधा, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार, महिला मतदार आदींसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहेत.
मतदान केंद्र २ किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेली आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार (पीडब्ल्यूडी), ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.
मतदान केंद्रामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी, शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्ची, बाकडे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशासाठी विद्युतव्यवस्था करण्यात आली असून दुर्गम भागात वीजजोड नसल्यास त्या ठिकाणी बॅटरीचालित एलईडी, चार्जिंगचे दिवे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शविणारे चिन्हे (साईनेज) लावण्यात येणार आहेत.
उन्हाळा लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सावली नसल्यास मंडपाची व्यवस्था करण्यात येत आहे. महिला व पुरुषांसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसह स्वतंत्र शौचालये, महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघरची सुविधा आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग मधील अनुक्रमांक शोधण्यासाठी मतदान मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर महिला, पुरुष आणि ज्येष्ठ व शारीरिक विकलांग मतदार यांच्यासाठी स्वतंत्र रांगा राहतील.
याशिवाय औषधोपचार किट, मतदान केंद्रावर शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांग, हालचाल करण्यास अक्षम (लोकोमोटिव डिसेबल्स) आदींसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर तसेच अशा मतदारांनी मागणी केलेली असल्यास घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल, असेही निवडणूक प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.