पो.डा. वार्ताहर , पुणे : लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक पोलीस निरीक्षक विवेकानंद सिंग यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला.
रायगड पोलीस आणि नवी मुंबई पोलीस कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्यादृष्टीने आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील नविन प्रशासकीय कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीस रायगड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, मावळ लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे, सहायक सचिन मस्के, अभिजित जगताप, मनीषा तेलभाते आदी उपस्थित होते.
नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा विषयक नियोजन आराखड्याबाबत नवी मुंबईचे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी माहिती दिली. पनवेल शहर, न्हावाशेवा, रबाळे, पनवेल ग्रामीण, रबाळे एम. आय. डी. सी., खांडेश्वर, कोपरखैरणे, कामोठे, वाशी, कळंबोली, तळोजा, खारघर, तुर्भे, सानपाडा, नेरूळ, उरण, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सुरक्षेच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच भरारी पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यांतर्गत सुरक्षा विषयक नियोजन आराखड्याबाबत रायगड ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती दिली. कर्जत, नेरळ, खोपोली, कळंब, खालापूर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रांवर तसेच भरारी पथक, तपासणी नाके, स्थिर सर्वेक्षण पथक, ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक काळात जप्त करण्यात आलेली रक्कम, शस्त्रे, अवैध मद्यसाठा याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. गुंडांवर केलेली कारवाई तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल झालेले विविध गुन्हे याबाबतदेखील बैठकीत माहिती देण्यात आली.