जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे.
पो.डा. वार्ताहर , भंडारा : आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मोहाडी व तुमसर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी आंधळगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील, डोंगरगाव येथील मोतीराम नेहर, दर्शन ईलमे, पालडोंगरी येथील निलू झनझाड, पुंडलीक गभने यांच्या शेतात जावून धानपीक व सुनिल रामटेके या शेतकऱ्यांच्या शेतात जावून धान पीक व भाजीपाला पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.
जिल्ह्यात एक ते दहा मे पर्यंत झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे 4 हजार 373 शेतकऱ्यांचे 1 हजार 519.50 हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी धान व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सर्वात जास्त मोहाडी व तुमसर तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने, तुमसर उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, मोहाडी तहसिलदार सुरेश वाघचौरे, तुमसर तहसिलदार श्री. टिकले, नायब तहसिलदार चांदेवार, गटविकास अधिकारी कविश्वर खोब्रागडे, कृषि अधिकारी श्री. बडके, विस्तार अधिकारी कृषि श्री. भाजीपाले व संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते.