बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जिल्हा प्रतिनिधी, बुलडाणा, : येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार कृषि निविष्ठा असलेल्या बियाणे, खते, किटकनाशकांच्या तक्रारीबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
खरीप हंगाम 2024 करीता गुणवत्ता नियंत्रण कामाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्रेत्याकडून विक्री होणाऱ्या बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांचा दर्जा निकृष्ट असणे, त्यात भेसळ असणे अथवा बोगस असणे आदीबाबत शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अथवा अन्य व्यक्ती, संस्था, प्रसिद्धी माध्यमाद्वारे तक्रारी प्राप्त होतात.
सदर तक्रारी सादर करताना शेतकऱ्यांनी अर्ज, मुळ देयक, बियाणे, खते व किटकनाशकाची पिशवी, टॅग, वेष्टन आदी तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत. त्यासाठी बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या समितीचे अध्यक्ष, उपविभागीय कृषि अधिकारी, तर तालुका कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठ, कृषि संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषि अधिकारी, पंचायत समिती हे सदस्य राहणार आहेत.
तक्रार करावयाच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केल्यानंतर तालुका तक्रार निवारण समिती ही स्थळ पाहणी करेल. तसेच तक्रारदार शेतकऱ्यांना पंचनामा देतील. या पंचनाम्याच्या आधारे शेतकऱ्यांना जिल्हा ग्राहक न्यायालय येथे दाद मागता येऊ शकेल. जिल्हा ग्राहक न्यायालय येथे दाद मागण्याकरीता आवश्यक दस्ताऐवज व मागदर्शन करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी कळविले आहे.