पो.डा. वार्ताहर, छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात दि.१० रोजी ‘अक्षय तृतीया’ या मुहूर्तावर अनेक विवाह होत असतात. त्यात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि,बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे सुचित करण्यात आले आहे, तसेच नागरिकांनाही अशा विवाहाची माहिती गोपनियरित्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्षभरात रोखले ७५ बालविवाह
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात (दि.१ एप्रिल २०२३ पासून) जिल्ह्यात आतापर्यंत ७५ बालविवाह रोखण्यात कृती दलाला यश आले आहे. त्यातील तीन प्रकरणांमध्ये गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशान्वये जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनाकरीता जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कायद्याची जाणीव व्हावी यासाठी तसेच बाल वयात बाल हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने कार्यवाही करण्याचे कामकाज सुरु आहे.
१ लाख रुपये दंड व २ वर्ष शिक्षा
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ या कायद्यान्वये मुलीचे वय १८ वर्षे तर मुलाचे वय २१ वर्षाच्या आत असतांना विवाह केला तर असा विवाह बालविवाह म्हणून गणला जातो. त्यासाठी १ लाख रुपये आर्थिक दंड व २ वर्षे सक्त मजूरीची शिक्षा किंवा दोन्ही असे शिक्षेचे प्रावधान आहे.
गावपातळीवर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी
ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवक तर नागरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे. आपल्या परिसरात वा गावात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास आपण संबंधितांकडे माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.
हेल्पलाईन १०९८ किंवा ११२
जिल्ह्यात कोठेही बालविवाह होत असतील किंवा होऊ घातले असतील तर नागरिकांनी अशी माहिती चाईल्ड हेल्प लाईन १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. बालविवाहाबाबतची माहिती जवळचे पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालय येथेही देता येईल. नागरिकांनी आपल्या जवळपास होणारे विवाह जर बालविवाह असतील तर त्याची माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी केले आहे.