पो डा वार्ताहर, वाशिम, : इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता ही योजना आहे.
इतर मागास प्रवर्गातील विदयार्थी/ विदयार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी १० लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी २० लक्ष रुपये इतके कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १७ ते ३० वर्ष असावे. तो इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावा. महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता ८ लक्ष रुपये आहे. अर्जदार इयत्ता १२ वी मध्ये ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान ६० टक्के गुणांसह तो उत्तीर्ण असावा. पदवीच्या व्दितीय वर्ष व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विदयार्थी ६० टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावे.
केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी, अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा व बँकेचा थकबाकीदार नसावा. बँकेने मंजूर केलेली संपुर्ण कर्ज रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. तरी इच्छुक, गरजू इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी कार्यालयाच्या 07252-231665 या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.