बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी आता जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु
तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार
पोलीस डायरी, हर्षल चिपळूणकर, जळगाव, : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत.
प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे. यामुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार आहे.
तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.
ही सर्व नोंदणी प्रकिया मोफत असून एजंट/त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन १/- रूपया नोंदणी फी भरुन नोंदणी करावी. व एजंट/त्रयस्थ व्यक्तींनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी एका प्रसिद्धीपत्रद्वारे केले आहे.