पो.डा. वार्ताहर, नाशिक : भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याची घटना नाशिकमधील मालेगाव येथे गुरुवारी पहाटे घडली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली. विकास सावंत, सुनंदा सावंत आणि मिनाक्षी हिरे अशी मृतांची नावे आहेत. वैभवी जाधव असे जखमीचे नाव आहे. सर्वजण ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील रहिवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमी महिलेला नाशिकमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुनंदा सावंत यांच्या आजारी वडिलांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचा मृतदेह मालेगाव येथील मूळ गावी अॅम्बुलन्सने नेण्यात येत होता. तर सुनंदा, त्यांचे पती विकास, बहीण मिनाक्षी आणि जखमी महिला वैभवी हे चौघेजण कारने चालले होते.
मात्र मालेगाव तालुक्यातील वाके परिसरात पहाटे साडेचारच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव अनियंत्रित कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. पीडितांसोबत दुसऱ्या कारमध्ये असलेल्या नातेवाईकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. तसेच अॅम्बुलन्स बोलावून जखमी महिलेला स्थानिक रुग्णालयात नेले. स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून महिलेला पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली.