परभणी, दि.९ पो. डा. प्रतिनिधी: शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील नागरिकांनी या अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले. सेलू येथील श्री साई मंदिर येथे आयोजित उपक्रमात श्रीमती गोयल बोलत होत्या.
श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, तालुका कृषी अधिकारी श्री. पठाण व संबंधीत विभाग प्रमुख उपस्थित होते.
सेलू येथे आज झालेल्या कार्यक्रमात महसूल 985, कृषी 92, पंचायत समिती 1 हजार 270, नगर परिषद 37, पशु संवर्धन 12, शिक्षण 48, आरोग्य 15 एकात्मिक बालविकास विभाग 20, महावितरण 5 याप्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागामार्फत तब्बल 2 हजार 484 लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते 210 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमाणपत्राचे वाटप व इतर लाभ देण्यात आला.
राज्य शासनामार्फत राबविण्यात देण्यात येणा-या विविध लोककल्याणकारी योजनेचा गरजू व पात्र लाभार्थ्यांना जलदगतीने लाभ मिळवून देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा व तालुका प्रशासन नागरिकांना शासन आपल्या दारी पोहचून तात्काळ लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले. नागरिकांनी ज्या शासकीय योजना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याबाबत अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा. त्यामुळे शासनाच्या योजनांचा विनाविलंब लाभ मिळण्यास मदत होईल, असे उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी लाभार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग प्रमाणपत्रांसोबत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला. त्यात संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ग्राम विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, रेशीम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास विभाग, ग्राम विकास विभाग, कृषि विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, रेशीम विभाग, पुरवठा व निवडणूक विभाग, संजय गांधी निराधार अनुदान योजना, एकात्मिक बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग, वन, शिक्षण, भूमी अभिलेख, भारतीय स्टेट बँक यांच्यासह शासनाच्या विविध विभागांकडून लाभ देण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागनिहाय स्टॉल लावून योजनेची नागरिकांना माहिती देण्यात आली.