वाशिम, दि. 08 पो.डा. प्रतिनिधी : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (नागपूर ते शिर्डी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होवून ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यानंतर २६ मे २०२३पासून शिर्डी ते भरवीर या पुढील मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन हा महामार्ग वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे.या महामार्गावर रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या दृष्टिने परिवहन विभाग,महामार्ग पोलीस विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने सुरु आहे.
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातापैकी काही अपघात हे वाहनांचे टायर फुटल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील अपघातात घट करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सीएट लिमिटेड टायर उत्पादकांमार्फत त्यांच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचे उपक्रम हाती घेतले आहे.
महामार्गावर प्रवास करतांना प्रवासादरम्यान वाहनांचे टायर योग्य गुणवत्तेचे, वेग मर्यादेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गावर प्रवास करतांना प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महामार्गाच्या सुरुवातीला सुरु करण्यात येणाऱ्या टायर तपासणी केंद्रावर वाहनांचे टायर तपासणी करुन ते पुढील प्रवासासाठी सुस्थितीत आहेत किंवा नाही याची खात्री करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती आणि टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या सर्व सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत.
याप्रमाणे टायर तपासणी केंद्र हे नागपूर व शिर्डी या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील टोल प्लाजा यांचे सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जेणेकरुन वाहन धारकांना योग्य जनजागृती/समुपदेशन करणे शक्य होणार आहे. या टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन परिवहन आयुक्त यांच्या हस्ते आज ८ जून २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता शिर्डी येथे करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी सुरु करण्यात येणाऱ्या या सुविधांचा लाभ वाहन धारकांनी घ्यावा. असे आवाहन परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.