नागपूर जिल्ह्यातील अतिसराचा उद्रेक झालेल्या दोन गावांमध्ये आज दोन जून रोजी राज्यस्तरीय आरोग्य पथकाने पाहणी केली. रुग्णांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी जलस्त्रोताकडे लक्ष वेधण्याची सूचना केली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज 2 जूनला प्रा. आ. केन्द्र भिषणूर व व प्रा. आ केंद्र जलालखेडा अंतर्गत मौजा पेठ मुक्तापूर या साथ उद्रेक गावात राज्यस्तरावरून आलेले राज्य साथ रोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळुंखे,व युनिसेफ सल्लागार डॉ. अमोल मानकर तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर तसेच, श्री. सी. जी. परुळकर प्रभारी अधिकारी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूर तसेच साथ रोग पथक जिल्हा परिषद नागपूर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन साथ रोग परिस्थिती कशामुळे उद्भवली या कारणाचे शोधन करणे व साथ उद्रेक नियंत्रणाबाबतची कार्यप्रणाली पाहणी केली.
दोन दिवसापूर्वी या भागामध्ये जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी परिस्थितीची पाहणी केली होती व रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.
आज राज्यस्तरीय पथकाने रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. प्रत्यक्ष पाण्याच्या स्तोत्राची पाहणी केली. तसेच आज रोजी पेठ मुक्तापुर बाह्य रूग्ण 2, तसेच भिष्णुर बाह्य रूग्ण 27 यापैकी आंतरुग्न 12 आढळून आले. लागण रुग्ण संख्यात घट झाल्याने पथकाने समाधान व्यक्त केले . प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय पथकाने नियमित गृहभेट सर्वेक्षण करून उपचार करावा तसेच जनजागृती करणे, व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबतचे सूचना करण्यात आल्यात.