माणसाचे मन हे दुर्गुणांचे माहेरघर आहे. असून या ठिकाणी जाण्यासाठी ९९९९ पायरया चढून जाव्या लागतात. प्रत्येक पायरीवर एक एक दुर्गुणाचा त्याग करीत चढायचे असते. शेवटच्या पायरीवर त्यागाचाही त्याग करायचा आहे. काम, क्रोध, मोह, माया, पाश हे एवढेच दुर्गुण नाहीत. तर त्यांच्या शाखा, उपशाखा, पोटशाखाही आहेत. त्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजल्या आहेत. जोपासल्या गेल्या आहेत. त्या समूळ नाहीशा होतील आणि प्रत्यक्ष श्रीदत्त भेटतील! अनेकांना लाभ मिळाला आपणही घेऊया.
*श्री गिरनार परिक्रमा*
गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे, यालाच परिक्रमा करणे असेही म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे. गिरनार च्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे. वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही. फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो. या जंगलात मुंगी, विंचू पासून ते सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत. पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे. देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे. कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते. त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात. आपल्या सारख्या सामान्य माणसांपासून ते साधू, संत आणि देव सुद्धा ही परिक्रमा करतात. त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वाद मिळाल्यास सोने पे सुहागा.
गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. तीन डोंगर चढणे आणि उतरणे. त्यात तीव्र चढ आणि अतीतीव्र उतार असे स्वरूप. रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही की कुठे झोपी जाण्यासाठी गादी-उशी. पाणी पिण्यासाठी नळ नाही की खाण्यासाठी हॉटेल. चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, झावळ्या, मोठे मोठे वृक्ष या मधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या ५ दिवसात करतात. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग हा काटे-कुटे, दगडे यांनी घेरलेला आहे. परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना श्रद्धस्त भक्त मंडळी उत्साहाने आणि श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात.परिक्रमेला सुरुवात झाल्यावर १२ किलोमीटर वर जिनाबाबा की मढी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम आहे अद्याप येथे, त्या चिलमीतून ते आत-बाहेर करत होते असे म्हणतात. यांची समाधी व धुनी येथे आहे. येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थान तर्फे उपलब्ध असते. शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात. थोडे पुढे छोटीसी नदी लागते ‘सरनो’ नावाची. त्यात बरेच जण स्नान करतात. तेथून पुढे ८ किलोमीटर वर मालवेला हे स्थान लागते. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे ८ किलोमीटर वर बोरदेवी चे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान आहे. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे.
परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासीं साठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. एकूण ३८ किमी अंतर आहे परिक्रमेचे. काहीजण पहाटे ५ ला निघून संध्याकाळी ७ पर्यंत पूर्ण करतात, आपल्या चालण्याच्या स्पीडवर अवलंबून आहे तर काहीजण २ दिवसात करतात. स्थानिक भक्तजन ४ दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे म्हणजे परिक्रमा परिपूर्ण होते.
*श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय* *निवासस्थान*
गिरनार यात्रा व गिरनार परिक्रमे बाबत घायवायची काळजी
१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.
२) चालण्यासाठी चांगली चप्पल किंवा बूट घ्यावा (sports sandal उत्तम )आणि त्यावर १०-१५ दिवस चालण्याचा सराव करावा.
३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.
४) साधारण रात्री ११ वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते. अंदाजे ५ तास लागतात.
५) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी. ६) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण ६००० पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो.
७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३० रुपये दर त्यातील २० रुपये परत मिळतात).
८) पाण्याची बाटली घ्यावी, रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले ३००० पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते.
९) खिशामध्ये खडीसाखर, गोड गोळ्या घेणे.
१०) कमरेला pouch असेल तर उत्तम.
११) सुरवाती पासून वर पादुका पर्यंत कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.
१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो.
१३) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो ६/८ ग्रुपमध्ये जावे). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.
१४) प्रत्येकाने बॅटरी जरूर बरोबर घ्यावी, २ जादा सेल बरोबर असावेत. वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे.
१५) आपल्यापेक्षा बरेच शारीरिक दृष्ट्या दुर्बळ व वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा. वेगळी अंतरिकशक्ती मिळते.
१६) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने चालण्याचा उत्साह अधिक वाढतो. बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी, आपला उत्साह वाढतो व श्रम परिहार होतो.१७) उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते.
१८) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावे त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली. त्यावर २, ३ मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो.
१९) त्रिपुरी पोर्णिमेच्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता मोकळा करते. तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे. दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा.
२०) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा. लोकं काय म्हणतील/बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते. अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात. डोलीचा खर्च आपले आपण करायचा असतो. येथे सरकार नियुक्त दरपत्रक आहे. सधारणतह माणसाचे वजनानुसार हा आकार असतो.
२१) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही, पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार, फुले मिळत नाही. कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता आपल्या सॅकमध्ये मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात.
शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप ताकद व उत्साह देतो, कारण तुम्हाला परत साधारण २००० पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे. विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये. जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा. त्यांना हि सेवा वर्षभर व वर्षानुवर्षे चालवायची आहे हे एक कठीण व्रत आहे. पण सेवाभावाने साधू व भक्तगण ते करीत आहेत.
*श्री क्षेत्र गिरनार*
श्री गिरनार परिक्रमा हि ३८ km ची ही पायी परिक्रमा असते. ही परिक्रमा फक्त पायी करता येते. डोली, वाहन या द्वारे करता येत नाही.
श्री क्षेत्र गिरनार-कमंडलू कुंड तिर्थ आख्यायिका
गिरनारवर श्रीदत्तगुरूंची तपस्या चालू होती. त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. सामान्य जीवांचे प्रचंड हाल होऊ लागले. हा दुष्काळ बरेच दिवस होता. शेवटी माता अनसूयेला हे बघवेना. त्या गिरनारवर श्रीदत्तगुरूंना तपस्येतून जागृत करायला आल्या. दत्तगुरु तपस्येत लिन होते. मातेने त्यांना जागृत करायला प्रारंभ केला आणि दत्तगुरु तपस्येतून जागृत होताना त्यांच्या कमंडलूला धक्का लागला आणि ते कमंडलू खाली पडले. खाली पडल्यावर त्याचे दोन भाग झाले. एक भाग जिथे पडला तिथे गंगा अवतीर्ण झाली तर दुसरा भाग जिथे पडला तिथे अग्नी उत्पन्न झाला. तेव्हापासून दुष्काळ संपुष्टात आला.
ते तीर्थ आणि अग्नी अजूनही गिरनारवर उपस्थित आहे. आता तिथे छोटासा छान आश्रम निर्माण झाला आहे. दर सोमवारी सकाळी ६ वाजता त्या धुनिवर पिंपळाची लाकडे ठेवण्यात येतात. कापूर, रॉकेल, काडेपेटी यांचा अजिबात वापर न करता हि धुनी आपोआप दत्तकृपेने प्रज्वलित होते. हा सोहळा अतिशय बघण्यासारखा असतो. त्यामुळे रविवारी रात्री गिरनार चढायला सुरुवात करून बरेचजण पहाटे कमंडलू कुंड येथे हजर होतात. लाकडाने आपोआप पेट घेतला की अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त चा गजर सर्वांच्या मुखातून होऊ लागतो. मग नैवैद्य वगैरे दाखवून सर्वांना जवळून दर्शन घेण्यासाठी आत सोडतात.
कमंडलू कुंडाचे पाणीच तेथे सर्व गोष्टींसाठी वापरले जाते. मुख्य कुंडातून इतर कुंडात ते पाणी साठवले जाते. महंत श्री मुक्तानंदगिरी बापू तेथील सध्याचे प्रमुख आहेत. इतर काहीजण तेथे सेवेसाठी आहेत त्यात योगेशबापू हे एक प्रमुख आहेत. आश्रमाच्या वतीने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अखंड अन्नदान चालू असते. चहा सुद्धा आश्रमातर्फेच उपलब्द करून देतात. १०००० पायऱ्यावर चहा, पूर्ण जेवण उपलब्ध करून देणे हे अतिशय कठीण आहे. प्रचंड वारा, कडक ऊन, धुवांधार पाऊस अशा अतिशय विपरीत परिस्थितीत हे सर्वजण विनामोबदला अहोरात्र सेवा बजावत असतात. अनेकजणांच्या देणगीवर हि सेवा अखंड चालू आहे. सध्या धुनिवर ठेवण्यासाठी पिंपळाचे लाकूड मिळणे कठीण जात आहे. पंचक्रोशीत फिरून पिंपळाचे झाड विकत घेऊन ते कट करून गिरनार पायथ्याशी आणले जाते व इथून लोकल माणसांकडून वर आणले जाते. त्यामुळे यासाठी बराचपैसा लागतो. आपणही कधी गिरनारवर गेलात तर सढळ हस्ते येथे काही रक्कम समर्पित करा. ‘दान’ हा शब्दप्रयोग मुद्दाम करीत नाही कारण आपण सर्व तेवढे मोठे अजिबात नाहीत. आपण जर ग्रुपने जात असाल तर प्रत्येकाने थोडी चहा पावडर, साखर, दूध असे वर घेऊन जावे, तेवढीच आपलीही सेवा तिथे रुजू करावी.
कमंडलू कुंड, धुनी आणि आश्रम यांची महती वर्णन करावी तेवढी कमीच आहे. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. एकदातरी गिरनारवर जाऊन हा अनुभव प्रत्येकाने घ्यावाच!
या क्षेत्री असे जावे
*गिरनार (जुनागड) (सौराष्ट्र गुजरात )*
हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते. जुनागड या शहरापासून हे स्थान २ किमी अंतरावर आहे. याच ठिकाणी श्री सद्गुरुदत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला. हे स्थान उंच पर्वतावर आहे. ह्या ठिकाणीसद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत. इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो याचा प्रत्ययभक्तांना नेहमी येतो.
या ठिकाणी जाण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद या शहरातून जुनागड (गिरनार) साठी नियमीत बससेवा आहे.
रेल्वे-मार्गाने जाण्यारया भक्तांसाठी सुरत, अहमदाबाद, राजकोट, जुनागड अशी रेल्वे सेवा आहे.
या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत.
*दामोदर कुंड, गिरनार*
*गिरनार – दामोदर कुंड*
जूनागढ़ कडून तलेटी (गिरनार) कड़े जाताना थोड़े अलीकडे उजव्या बाजूस पुराणप्रसिद्ध दामोदर कुंड लागते. हिन्दू पुराणानुसार हे अत्यंत पवित्र मानले जाते. हिंदुंच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन येथे केल्यास मृत व्यक्तिस मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. येथील तलावाच्या पाण्यात अस्थि विरळघणारे गुणधर्म आहेत. तलाव जवळपास २५० फुट लांब व ५० फुट रुंद आहे आणि खोली केवळ ५ फुट आहे. सभोवताली घाट आहे. शेजारीच दामोदर हरी मंदिर आहे. येथील मूर्तिची प्रतिष्ठापना श्रीकृष्णच्या नातवाने वजाराभा याने केली असावी असे मानले जाते. ऐतिहासिक दृष्टया हे मंदिर चंद्रनाथपुर नावाच्या सूर्यवंशी शासकाने बांधलेले किंवा जिर्णोद्धार केलेले आहे. ३२एकर क्षेत्रफळ असणारे हे मंदिर गुलाबी वाळूच्या दगड़ात बांधलेले आहे. त्यात आतील निज मंदिर आणि बाहेरील मंडप यांचा समावेश आहे. प्रत्येकास एक शिलाहार आहे, ज्यामध्ये सुमारे ८४ उत्तम सुव्यवस्थित खांब आहेत. निज मंदिरचे शिखर ६५ फूट उंच असून मंडपचे शिखर ३० फूट उंच आहेत. दामोदरजीची मूर्ती चतुर्भुज रूपात आढळते, प्रत्येक हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ घेऊन आहे. श्री राधा रानीसह. दोन्ही मूर्ती काळ्या दगडापासून कोरलेल्या आहेत आणि सोने आणि रेशीम यांनी जोरदारपणे सुशोभित केलेली आहेत. भगवान बलराम, श्री रेवती आणि भगवान गणेश यांना समर्पित इतर उप मुर्ती आहेत. मंदिर संकुल वर आणि बाहेरील अनेक इतर मंदिरे आहेत. येथे श्री दामोदरजींची सेवा वैष्णव परंपरेत केली जात आहे. श्री दामोदरजी हे गिरी नारायण ब्राह्मण समाजाचे ईष्टदेव आहेत. आणि इतर अनेक स्थानिक समुदाय आहेत. पारंपारिक श्रद्धेनुसार, जवळपास १२००० वर्षांपूर्वी गिरी नारायण समुदाय येथे रहात आहे.
*जय गिरनारी !*
गिरनार पर्वताचे जवळ जवळ 60 वर्षापूर्वीचे चित्र
भगवान दत्तात्रेय यांचे स्थान असलेले गिरनार पर्वताचे जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचे चित्र. याच्यात पर्वतावरील सर्व महत्वाची स्थान दर्शविली आहेत.
गिरनार परिक्रमा श्रेष्ठ पुण्यसंचय, कथाभाग
गिरनार यांचे नाव गीर नारायण होते. आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि समस्या बघता सर्व देव चिंतीत झाले. आणि महादेवांकडे गेले. सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे, हि बातमी गीर नारायण यांना समजल्यावर, आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून, त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता, व तेथे एक ब्रम्ह तळ होते, त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले, आणि फक्त चेहरा वर ठेवला. तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे. आणि गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून, त्यांनीमहादेव यांना वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात. तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिर नारायण आताचे गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे, गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय. सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे प्रत्येक दत्तभक्तांनी आयुष्यात एकदा तरी करून पुण्यसंचय करावा.