क्रीडा संकूलात जागतिक योग दिनाचे आयोजन
चंद्रपूर, दि. 21 : धावपळीच्या जीवनात मनुष्याला निरोगी राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. यावर मात करायची असेल तर दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा व नागरिकांनी निरोगी जीवन जगावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, पतंजली योग समितीचे शरद व्यास, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक समशेर सुभेदार उपस्थित होते.
निरोगी शरीरासाठी तसेच आध्यात्मिक बदलासाठी योगा आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, दैनंदिन जीवनात सर्वांनी योगाभ्यास करावा. त्यामुळे वैयक्तिक जीवन तर आरोग्यदायी होईलच शिवाय समाजसुद्धा आरोग्यदायी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात 12 ठिकाणी योग शेड तयार करण्यात येईल. आमदार अडबाले म्हणाले, योगा हे एक विज्ञान आहे. विज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास केला तर त्याचा फायदा आपल्याला व समाजाला सुद्धा होईल. शिक्षण क्षेत्रात योगविद्या विकसीत करण्याकरीता प्रत्येक शाळा – महाविद्यालयात योगासनाचे मार्गदर्शक नेमण्यात येईल. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पतंजली योग समितीच्या पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले. संचालन क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले. यावेळी विजय चंदावार, अशोक संगिदवार, अरविंद सोनी, सुधाकर सिरपूरवार, हरीदास कापते, रमेश दडगल, मुरलीधर सिरभाया यांच्यासह क्रीडा अधिकारी कार्यालयाचे जयश्री देवकर, संदीप उईके, विजय डोबाळे, प्रवीण देसाई, क्रीडाप्रेमी, योगसाधक, शासकीय कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी, वरिष्ठ नागरिक विविध संघटनांचे प्रतिनिधी व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
योगगुरुंनी शिकविलेली प्रात्याक्षिके / आसने : यावेळी योग गुरुंनी सुखासन, विद्यासन, पद्मासन, दंडासन, ग्रीवाचारण (मानेचा विशिष्ठ व्यायाम), स्कंदचक्र, कटीचक्र, ताडासन, वृक्षासन, अधिचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ठासन, सशाकासन, उत्तानमंडूकासन, मक्रासन, वक्रासन, भुजंगासन, स्कंधरासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, ध्यानमुद्रा, कपालभारती, अनुलोमविलोम, आम्रीप्राणायाम, मनोध्यान आदी आसने प्रात्यक्षिक स्वरुपात उपस्थित नागरिकांकडून करून घेतली.